कोमल... पण कणखर!

कोमलचा हा फोटो जेव्हा जेव्हा म्हणून मी बघतो तेव्हा तेव्हा मला खूप छान वाटतं. आठवीत असल्यापासून मी या मुलीला आवडिने शिकायला येताना पाहत आहे. इतर मुलींमध्ये आणि तिच्यात असलेलं वेगळेपण अगदी सुरुवातीपासूनच मला जाणवत आलंय.



नेतृत्व. धाडस. एखाद्याच्या अंगी जर हे गुण असतील तर ते लक्षात आल्यावाचून राहत नाहीत. जेव्हा जेव्हा म्हणून एखादा उपक्रम करायचा असतो तेव्हा कोमल, अनिकेत सारखी मुलं पुढे येउन स्वतःहून पुढाकार घेतात. मग ते वृक्षारोपण असो, स्वच्छता मोहीम असो, शिबीरासारखा मोठा कार्यक्रम असो किंवा अगदी पार्टी करणं असो. जलवृद्धी उपक्रमाच्या वेळी चर खणण्यासाठी कोमलनं दिवसा आणि रात्रीही मुलींना गोळा केलं. ती स्वतःही त्यासाठी नेहमी आवडिने येत राहीली. गावच्या मुलांची ही एक खासियत आहे. तुम्ही त्यांना अभ्यास सांगाल तर ते पळतील. तुम्ही त्यांना कामं सांगाल; ते अतिशय आनंदाने करतील. पण कोमल अभ्यासाच्या वेळीही आवडिने येउन बसत असे. कुठलीही गोष्ट अतिशय लक्षपूर्वक ऐकण्याची तिची वृत्ती मला सर्वात जास्त भावते. एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून द्यायची वृत्ती नाही तिची. कानावर पडणारी प्रत्येक गोष्ट ती जणू मनात साठवून घेते. त्यावर विचार करते.


ती एक विचार करणारी मुलगी आहे. अभ्यासिकेमुळे शैक्षणिक पेक्षा तिची जी मानसिक जडणघडण गेल्या तीन वर्षांत झाली आहे, ती मला आकर्षित करते. कोमल सारखी सारासार विचार करणारी आणि अभ्यासाची आवड असणारी विद्यार्थिनी जर मुंबईसारख्या शहरात असती तर? हा प्रश्न अनेकदा माझ्या मनात रुंजी घालून जातो. खरंच! या मुलीला आवश्यक ती संधी, सुविधा आणि मार्गदर्शन मिळालं असतं तर कदाचित तिच्या सर्वांगीण प्रगतीत चांगलीच भर पडली असती. असो. आतापर्यंत जे झालं नाही, त्यावर यापुढे तरी ते होईलसं बघणं हेच आपल्याला करायचे आहे.
सध्या कोमल अकरावीत कला शाखेत शिक्षण घेत आहे. त्याचबरोबर पेणंद या गावातल्या सूर्या अभ्यासिकेच्या प्राथमिक विद्यार्थ्यांची ती शिक्षिका आहे. यंदाचं तिचं बारावीचं वर्ष असणार आहे. इंग्रजीसारख्या विषयात तिची असलेली पीछेहाट भरून काढणं गरजेचं आहे. तसंच तिच्या शैक्षणिक विषयांमध्ये असणाऱ्या अडचणींना जाणून घेणं गरजेचं आहे. याहूनही जास्त गरजेचं आहे ते तिला तिच्या पुढच्या करिअरविषयीची योग्य दिशा सापडणं.


कोमलच्या जडणघडणीत तिच्या घरच्यांचा वाटा सर्वात मोलाचा आहे. तिचे वडील आणि आई दोघेही समंजस असून तिच्या शिक्षणाला आणि गावातील नेतृत्वाला प्रोत्साहन देणारे आहेत. संदीपदादा, वहिनी यांनीही वेळोवेळी स्वतःहून श्रमदानात पुढाकार घेउन माती वाहिली आहे. चर खणले आहेत. असे आईवडील असल्यावर मुलीवर होणाऱ्या संस्कारांची कल्पना आपण करू शकतो. 


दोन वर्षांपूर्वी दारशेत गावात श्री सिद्धा सन्मार्गा संस्थेच्या सौजन्याने आणि सेवा सहयोग फाऊंडेशनच्या पुढाकाराने आम्ही एक क्रीडा महोत्सव आयोजित केला होता. या क्रीडामहोत्सवात दारवेपाडा, दहिवाळे, पेणंद, करवाळे, नांगरमोडी, तांदुळवाडी, दारशेत अशा गावांतील अभ्यासिकांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रथमच गावातल्या मुलांना वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी व्हायला एक सुंदर व्यासपीठ तयार झाले होते. कोमलही त्या महोत्सवात मॅरेथॉन, बॅडमिंटन, लांब उडी अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी झाली होती. त्यापैकी बॅडमिंटन स्पर्धेत तिने सलग सहा सामने जिंकत प्रथम पारितोषिक पटकावले होते. तिला बॅडमिंटन खूप चांगले खेळता येते अशातला भाग नसला तरी तिने दोन आठवडे आवडिने खेळून तो खेळ आत्मसात केला होता. आणि स्पर्धेदरम्यान एका मुरलेल्या स्पर्धकासारखी ती खेळत होती. तिचा तो संयमित खेळ पाहताना मला राहून राहून वाटत होतं की कोमल सारख्या 'कणखर' मुलीत कठीण परिस्थितीत देखील न डगमगता योग्य निर्णय घेण्याची क्षमता नक्कीच आहे. तिच्यातला हा गुण तिला खूप पुढे घेउन जाऊ शकेल.


विद्यार्थ्यांना फक्त शैक्षणिक दृष्टीकोनातून बघणं, मला कधीच पटत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गती ही संपूर्ण वेगळ्याच डायमेन्शन मधली आहे. त्यांच्या पुढ्यातले शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक अडथळे हे त्यांच्या एकूणच प्रगतीवर लक्षणीय परिणाम करतात. सेवा सहयोग फाऊंडेशन ही संस्था विद्यार्थ्यांच्या मार्गातले अडथळे स्वतःहून बाजूला सारत नाही; तर ते अडथळे लिलया पार करण्याची ताकद विद्यार्थ्यांच्या मनात तयार करण्याचा प्रयत्न करते. स्वतःच्या पथावरचे अडथळे सहज पार करणारे सशक्त विद्यार्थीच उद्याच्या भारतासाठी हवेत आपल्याला!


यंदाच्या वर्षी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारी कोमल दररोज स्वतःचा अभ्यास संभाळत गावातल्या मुलांचा अभ्यास घेते. गावाच्या विकासकामांचं नेतृत्व करते. नुकत्याच स्थापन झालेल्या पेणंद गाव आरोग्य समितीची ती सहसचिव आहे. गावातील महिलांनी आणि पुरुषांनी एकमताने तिची यासाठी नियुक्ती केली आहे. भविष्यात फार मोठी कामे पार पाडायची आहेत. आणि त्यासाठी नावाने कोमल पण मनाने 'कणखर' असणारी ही आमची विद्यार्थिनी, शिक्षिका, स्वयंसेविका सर्वतोपरी तयार आहे.

Comments