अभ्यासिकेत भरली विठ्ठल नामाची शाळा

विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला,
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडीला SSS

राम कृष्ण हरी माऊली, राम कृष्ण हरी! आषाढी एकादशी निमित्त गेली कित्येक शतके महाराष्ट्र भक्तिमय सागरात चिंब होतो आहे. यंदाही ठिकठिकाणी विठुरायाच्या भक्तांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने आनंद वाटला. पण माऊली, तुम्हाला सांगतो बरं, भक्तीचा हा वारसा गेले कित्येक पिढ्यानपिढ्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सरकत आहे. काळ बदलला, चालीरीती बदलल्या, कितीतरी जुन्या परंपराही नामशेष झाल्या पण आषाढी एकादशी निमित्त वारीला आजही लाखोंचा जमाव जातो बरं का माऊली! आणि यात काही फक्त ज्येष्ठ आणि वृद्ध मंडळी जातात असं अजिबात नाही बरं का माऊली! अगदी ४-४ वर्षांची मुलंसुद्धा टाळ-चिपळ्या हाती घेऊन वारीत ताल धरतात.

आता तुम्ही म्हणाल माऊली, आम्हाला आहे कुठे सवड? आमचे पोट आमच्या हातावर आणि त्यासाठी कामाला जावे लागते रोज. करणार काय माऊली? आम्हालाही वाटते चंद्रभागेच्या काठी उतरावे. कळसाचे दर्शन घ्यावे. पण हे जमायचे कसे? माऊली काही हरकत नाही. आहात तिथून डोळे मिटा आणि हरीनामाचे स्मरण करा. तुकोबारांची प्रार्थना हरीपुढे ठेवा, म्हणा,

हेचि दान देगा देवा | तुझा विसर न व्हावा ||
गुण गाईन आवडी | हेचि माझी सर्व जोडी ||

देवा, मला हेच दान द्या की तुझा विसर मला कधी न पडो. तुझे गुण मी आवडीने गाईन कारण हीच माझी खरी संपत्ती आहे.

माऊली तुम्हाला सांगतो आपल्या अभ्यासिकांमध्ये ज्ञाना-मुक्तासारखी जी लेकुरवाळे येतात की नाही त्यांनी सुद्धा कालच्या आषाढी एकादशी निमित्त माऊलीचे गुण आवडीने गायिले. काय धम्माल केली हो मुलांनी. जणू काही ठिकठीकाणी प्रती पंढरपूरच अवतरले म्हणा ना!

आता तुम्हाला तर माहितीच आहे माऊली की सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबईच्या वतीने मुंबई उपनगर, पालघर, रायगड, ठाणे, नवी मुंबई परिसरात १०० अभ्यासिका वस्ती आणि गाव-पाड्यांच्या ठिकाणी चालविल्या जातात.  ३००० पेक्षा जास्त विद्यार्थी या अभ्यासिकांमध्ये रोज अभ्यास करायला जमतात माऊली! ज्यांच्या घरी अभ्यास करण्यास जागा नाही, लाईट नाही, अभ्यास करून घेण्यास कुणी नाही अशा होतकरू मुलांसाठी आपण या अभ्यासिका चालवतो माऊली. त्याच वस्तीतली एखादी ताई, एखादा दादा किंवा एखाद्या बाई या अभ्यासिकेच्या शिक्षिका म्हणून मुलांकडून अभ्यास करवून घेतात. त्यांना संस्काराच्या ४ गोष्टी शिकवतात. मुलांना अभ्यासाची आवड लागावी यासाठी विविध खेळ आणि उपक्रम त्यांच्यासाठी घेतात. नुसता अभ्यासच नाही का बरं माऊली, या अभ्यासिकांमध्ये अनेक खेळ, उपक्रम वर्षभर होत असतात. आता आषाढी एकादशीच्या निमित्त्ताने पण माऊली ठिकठीकाणी मुलांनी काय आनंद वाटला म्हणून सांगू?

ठाण्याच्या सिद्धकला अभ्यासिकेत अवतरलेले विठ्ठल रखुमाई
घ्या दर्शन घ्या माऊली! ठाण्यात चालणाऱ्या सिद्धकला अभ्यासिकेत काल प्रत्यक्ष माऊलीच अवतरली की हो! लोकमान्य नगर पाडा नंबर ३ मध्ये दया कुबल यांच्या घरी ही अभ्यासिका चालते. अभ्यासिका शिक्षिका दया ताई बाळ गोपाळांसोबत काय काय मज्जा करतात म्हणून सांगू? पण सांगण्यापेक्षा माऊली तुम्ही खालची व्हिडीओच बघा की!



पाहिलंत माऊली? कित्ती कित्ती मज्जा केली आहे मुलांनी? ठाण्यातच अनमोल विद्यामंदिर म्हणून आहे. येथे माऊली 'मनकर्णिका अभ्यासिका' चालते. फार फार हुशार मुली आहेत बरं का या अभ्यासिकेत! तर त्यांनी काय केलं माऊली? आषाढी एकादशी निमित्त मुलींनी 'विठ्ठलाची भक्ती' हे छोटेसे नाटकच बसवून अभ्यासिकेत सादर केले.

नाटुकली सादर करताना मनकर्णिका अभ्यासिकेच्या विद्यार्थिनी 

ठाण्यातच आर. जे. ठाकूर विद्यालयात माऊली आपली आणखी एक अभ्यासिका भरते. वर्षा लंबाटे या तिथल्या शाळेच्याच शिक्षिका अभ्यासिका शिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. पहा या रुक्मिणी अभ्यासिकेतील रुक्मिणी आणि विठुमाऊली कसे नटून आले होते. कळवा येथील मीराबाई अभ्यासिकेतही विद्यार्थी अशाच प्रकारे नटून थटून आले होते. 

भक्तांची मांदियाळी - रुक्मिणी अभ्यासिका - ठाणे 
मीराबाई अभ्यासिकेतील विद्यार्थी 


कर्जत हा रायगड मधील एक तालुका. या ठिकाणी आपल्या एकूण १२ अभ्यासिका चालतात. आषाढी एकादशी निमित्त कर्जत मधील अभ्यासिकांध्ये तर उत्साहाचे वातावरण होते. बारणे या गावातील अभ्यासिका शिक्षिका रेश्मा मुने आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी एकादशीची फारच जोरदार तयारी केली होती. संपूर्ण गावासाठी अभ्यासिकेचे विद्यार्थी आता काय करणार? असे मोठे कुतूहलच होते. एकादशीच्या सकाळी सर्व अभ्यासिकेची मुले नटून थटून जमली. त्यांचे पालक देखील जमले. आणि मग विद्यार्थी आणि पालकांची दिंडी निघाली! लेझीम खेळत, पालखी नाचवत हरीनामाचा गजर साऱ्या गावातून घुमला. या दिंडीत विठठल रखुमाई सुद्धा अवतरले होते बरं का माऊली! 

दिंडी नंतर गाणी, अभंग व नृत्यांचे, नाटकांचे सादरीकरण असा भरगच्च कार्यक्रम मुलांनी केला. बारणे गावाला पंढरपूरचेच स्वरूप प्राप्त झाले होते. 

अभ्यासिका शिक्षिका रेश्मा मुने 

गावातून निघालेली दिंडी 

अवघ्या जमल्या मुक्ताई- जनाई - जय हनुमान अभ्यासिका बारणे 

पालखी वाहू विठूची - जय हनुमान अभ्यासिका - बारणे 

याची देही याची डोळा अनुभविले पंढरपूर - जय हनुमान अभ्यासिका बारणे 


याचप्रमाणे गौरकामत गावात देखील हिरकणी अभ्यासिकेच्या शिक्षिका वेदिका रोकडे यांनी देखील विद्यार्थ्यांना सोबत घेत गावातून दिंडी काढली. 

टाळ घेऊ हाती मुखी बोलावा विठ्ठल - हिरकणी अभ्यासिका - गौरकामत 
अहिल्या अभ्यासिका ही कर्जत मधील वदप या गावात चालते. या अभ्यासिकेत अनेक छोट्या छोट्या चिमुरड्यांची मांदियाळी आहे. या मांदियाळीला घेऊन अभ्यासिका शिक्षिका लक्ष्मी बहादरे यांनी देखील गावातून दिंडी काढली. बालगोपालांनी टाळ चिपळ्यांच्या नादात आनंदाने हरिस्मरण केले. 

जणू ज्ञान्या, सोपान्या, मुक्ताई... अहिल्या अभ्यासिका वदप 

मुंबईसारख्या शहरातल्या अभ्यासिकांचे विद्यार्थी आणि शिक्षकही काही कमी नाहीत हं माऊली! भांडूप पूर्व येथे चालणाऱ्या भवानी अभ्यासिकेतील मुलांनी चक्क विठूरायाची पालखीच बनवली की हो! आणि तिची मिरवणूक सुद्धा काढली!

पालखी ज्ञानाची आणि भक्तीची - भवानी अभ्यासिका - भांडूप 
बोरीवलीच्या रामकृष्ण शाळेत चालणाऱ्या अभ्यासिकेचे नावच 'माऊली अभ्यासिका' आहे माऊली! मस्तच ना! तर ही माऊली अभ्यासिका ही दिंडी काढण्यात पुढे होती माऊली.

दिंडी पताका घेऊन हाती नाचती वैष्णव भाई - माऊली अभ्यासिका - बोरीवली 

माऊली अभ्यासिकेतील गोंडस माऊली 

पालघर जिल्ह्यातील अनेक आदिवासी पाड्यांवर आपल्या काही अभ्यासिका चालतात माऊली. वसई तालुक्यातील सकवार या गावात आपली एक अभ्यासिका चालते. या अभयसिकेचे नाव 'टकमक अभ्यासिका'. इथे असलेल्या अभ्यासिका शिक्षिका दीपिका खेतरमल आणि सविता बरफ यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन गावातून  दिंडी काढत 'झाडे लावा, झाडे जगवा' असा  संदेश दिला. किती थोर विचार माऊली! 

सकवार गावातील दिंडी - टकमक अभ्यासिका - सकवार 

वाडा परिसरातील देवघर गावात जिजाऊ अभ्यासिकेतही विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी साजरी केली. या पहा तेथील मुक्ताई-जनाई कशा फुगडी खेळत आहेत. 






सर्व अभ्यासिकेच्या शिक्षकांनी स्वतः पुढाकार घेत आपापल्या अभ्यासिकेत आषाढी एकादशीचा सोहळा घडवून आणला माऊली. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना या सोहळ्यातील आनंद अनुभवता आला. आजकाल मोबाईल आणि गेम्स मध्ये दिवस दिवस भर हरवून जाणाऱ्या पुढच्या पिढीपर्यंत वारी आणि दिंडीचा वारसा पोहोचविण्यास अभ्यासिका शिक्षक यशस्वी झालेत म्हणायचे माऊली. आता हे वारीला जाण्याइतकेच पुण्याचे नाही का माऊली? बघा! आता या प्रश्नाचे उत्तर आपणच द्या.

आणि हो जाता जाता वारी बद्दलची थोडीशी माहिती तुम्हाला हवीय का? आमच्या एका मुक्ताईच्या मुखातूनच प्रत्यक्ष ऐका की माऊली!


माऊली जाता जाता एवढेच सांगतो की आपणही या अभ्यासिकांना भेट द्यायला एकदा तरी जरूर जा. अनेक विद्यार्थी आपली वाट पाहत आहेत. तुम्ही त्यांना गोष्ट सांगा, गाणे सांगा किंवा तुम्हाला हवा तो विषय त्यांना शिकवा. तुम्ही दिलेल्या थोड्याशा वेळेमुळे कदाचित या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर गोड हसू येईल एवढे तरी निश्चित! पुन्हा भेटूयात नवीन लेखात.

राम कृष्ण हरी!



Comments

  1. अक्षय, किती सुंदर पोस्ट तयार केलीयस !
    मुलांच्यापेक्षा तुझ विकास अतिवेगाने होतांना दिसतोय मला!

    ReplyDelete
  2. सेवा सहयोगचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. ब्लाॅग मधील सर्व माहिती सुंदर मांडली आहे . व्हिडिओ पण छान घेतलेत.

    ReplyDelete
  3. अतिशय उत्तम योजनाबद्ध लिखण

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts