मन वेल्हाळ पाखरू: भाग १

पहिल्यांदाच अभ्यासिकेतल्या मुलांसमोर पेणंद गावात मी एक प्रेझेंटेशन करत होतो. शाळेतल्या खोलीत छानपैकी अंधार आम्ही केला होता. प्रोजेक्टर स्क्रीन लावली होती. आणि स्क्रीनवर एक रानपिंगळ्याचा मजेशीर फोटो होता. त्याच्याशेजारी पिपिटीचं शीर्षक. 

'पक्षी आपले मित्र' 

रानपिंगळ्याच्या पहिल्याच फोटोपासून मुलांचे लक्ष स्क्रीनवर दिसणाऱ्या पक्ष्यांच्या आकर्षक फोटोंवर खिळले होते. ओळखीचा पक्षी दिसला की ती आनंदाने चीत्कारत होती. त्याचे आदिवासी बोलीतील नाव उच्चारत होती. प्रत्येक पक्ष्याच्या फोटोबरोबर त्याच्यावरील माहितीची देवाणघेवाण करत प्रेझेंटेशन चालले होते. होता होता इंडियन रोलर या अत्यंत आकर्षक रंगाच्या, मोहक पक्ष्याचा फोटो स्क्रीनवर आला. हा माझ्या आवडत्या पक्ष्यांपैकी एक. त्याच्या पंखांची निळाई पाहून मुले फार अचंबित होतील, असा माझा कयास होता. पण मुलांनी तो अगदी मोडीतच काढला. रोज संध्याकाळी खेळायला येणाऱ्या गावातल्याच एखाद्या ओळखीच्या सवंगडीला पाहिल्याचा आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. 

"हा पक्षी तुम्ही कदाचित पाहिला नसेल; कारण हा पक्षी आपल्या गावात -" 

"पाहिलाय दादा. आपल्या गावात दिसतो." 

अमोलने मला सुखद धक्काच दिला. 

"आपल्याकडे हा पक्षी दिसतो? कुठे दिसतो? कधी पाहिलास?" माझी उत्कंठा भलतीच वाढली. 

"दादा, अमोल खातो हा..." 

अमोलच्या बहिणीने पुरवलेल्या तक्रारीवजा माहितीने मी उडालोच! इंडियन रोलरसारखा सुंदर पक्षी कोण कसं 
काय खाऊ शकतं? मी अमोलकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर ओशाळलेपणा, मिस्किलपणा, खट्याळपाणा यांची चांगलीच सरमिसळ दिसून येत होती.

"हो दादा, मस्त लागतो..." 

दुसऱ्याच दिवशी अमोलने मला 'ताशा' पक्षी त्याने जिकडे फासात गुतवलेला ती जागा दाखवली. पेणंदमध्ये गावपांढरीला लागूनच अकराबारा एकराचा मैदानाचा तुकडा आहे. त्यात सगळी भाताची चोंढी. एका बाजूने चढत जाणारं पानगळीचं रान आणि मधूनच गेलेला डांबरी रस्ता. अर्थात ताससाहेबांसाठी अनुकूल जागा! 

इंडियन रोलरला नीलपंखी, नीलकंठ, तास, चास अशी भारतभर नावे आहेत. अमोलने उच्चारलेला 'ताशा' शब्द तासशीच मेळ खाणारा आहे हे बघून छानच वाटलं. चवदा पंधरा वर्षाचा अमोल हा जंगलात फिरण्यात आणि पक्षी मारण्यात तरबेज. त्याच्यासोबत त्याचे इतर साथीदार देखील. कुठला पक्षी कुठे बसतो आणि त्याला गुंतवण्यासाठी कुठे फासे लावायचे, काय भक्ष्य ठेवायचे हे या बहाद्दरांना बरोबर माहिती. अमोल आणि मी दोन दिवस भटकलो पण पक्षी दिसला नाही. तरी एका झाडाच्या खाली एक निळसर पिस अमोलला दिसलंच. ते पिस त्याने मला दिलं. 

सफाळे पासून डहाणू पर्यंत फिरताना अनेकदा अनेक पक्षी मला वेळोवेळी दिसले. कधी झिंगल्यासारखे उडणारे वेडे राघू, कधी पिवळा मळवट भरलेली सुगरण, कधी जांभळा खंड्या तर कधी उडता उडताच शिकार करणारा ससाणा. कधी उघड्या चोचीचा करकोचा तर कधी ढोकरी. काही सहसा न दिसणारे पक्षी देखील पाहायला मिळाले. इंडियन रोलर मात्र त्यादिवसापासून दिसला नव्हता. आणि एकदा दोन दिवस पेणंदमध्ये राहून बसमधून स्टेशनला परतताना तो मला वीजेच्या तारेवर बसलेला दिसलाच! चालत्या बसमधून निसटते पण स्पष्ट दर्शन त्याचे घडले आणि मनाला खूप छान गुदगुल्या झाल्या. बसच्या खिडकीतून चेहऱ्यावर झेपावणारा वारा झेलतच मन अगदी भुतकाळात उडून गेलं. 

डोंगरपाड्यातल्या आमच्या कोलवाडीतली भूषण आणि पिंट्या यांची जोडी पक्षी मारण्यात पटाईत होती. त्यांच्यापाशी स्वतः बनवलेल्या बेचक्या होत्या. त्यांची पाहून मलाही बेचकी हवी होती. पण घरातून बेचकी घेण्याला परवानगी नव्हती. त्यांच्यामते बेचकीमुळे कुणाचाही डोळा फुटू शकतो. गंभीर इजा होऊ शकते. खरेच होते ते! पण पिंट्याच्या बेचकीतून निघालेला दगड आकाशात वर जाताना पाहिला की माझं मन हरखून जायचं. पिंट्या हाडापेराने दणकट होता. रंगाने सावळा. त्याच्या माजघरातल्या खांबासारखा त्याचा सावळा रंग तुकतुकीत होता. पक्षी मारणे हा त्याचा एक आवडता छंद होता. त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या बेचक्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे फासे होते. हे सर्व तो स्वतः तयार करी. पिंट्या कधीच कशाला भीत नसे. दलदलीच्या गवतातून तो सहज चालत जाई. आणि गुंतवलेला बगळा, बेंचा घरात घेउन येई. बगळा, बेंचा, कबूतर यांच्या चविष्ट मटणाच्या गोष्टी तो मला सांगे. पण ते खायची इच्छा कधी माझ्यात आली नाही. 

मला फक्त बेचकी हवी होती. आणि त्या बेचकीतून सुटणारे गोटे बरोबर लक्ष्याला भेदताना मला पाहायचे होते. मलाही त्याच्यासारखं किंवा भूषणसारखं आज मी अमुक पक्ष्याला उडवलं, आज मी तमुक पक्ष्याला उडता उडता पाडलं हे सारं त्यांना सांगायचं होतं. मला बाकी पक्षांशी काही देणंघेणं नव्हतं. 

पिंट्या आणि भूषण यांनी त्यांच्याबरोबर रोज संध्याकाळी पक्षी पकडायला यायच्या अटीवर मला बेचकी बनवून देण्याचे मान्य केले. मी त्यांच्यासोबत दलदलीतून फासे घेउन त्यांच्या मागे फिरू लागलो. जमवलेले गोटे घेउन त्यांच्यासोबत पक्ष्यांना मारत फिरू लागलो. आणि माझ्यावर खुष होऊन अखेर त्या दोघांनी मला छान बेचकी बनवून दिली. आणि माझे प्रशिक्षण जोरातच सुरू झाले. रिकामी डबे लांबलांबच्या अंतरावर भूषण ठेवे. आणि मला बेचकीने ते उडवायला सांगे. मी तहानभुक विसरून बेचकीने गोटे मारत सुटलो होतो. पण त्या दोघांसारखा नेम काही जमेना. घरात माझ्या या उपक्रमाचा सुगावा अजून कुणाला लागला नव्हता. माझी बेचकी सुद्धा भूषणच्याच घरात मी ठेवत होतो. 

हळूहळू डबडी उडू लागली. वीजेच्या खांबांवर 'टंगssssss' असा ध्वनी उमटू लागला. इतकेच काय चिंचेच्या आकड्या सुद्धा तुटून पडू लागल्या. मला एकदम कसला तरी भरपूर हुरूप चढला. बेचकी घेउन आता मी ऐटीत पावलं टाकू लागलो. तुच्छतेने भोवतालच्या इतर मुलांकडे पाहू लागलो. आता मी भूषणसोबत पक्ष्यांचा माग धरायला सुरुवात केली. पण पक्षी टिपायचं म्हणजे काय खायचं काम नव्हतं. एकतर पक्ष्यांच्या जरा जरी जवळ गेलं की ते पटकन उडून जातात. बगळ्यांकडे तर नुसतं पाहिलं तरी ते उडून पसार! कबुतरे तशी मारायला सोपी. पण बसलेली सापडणं मुश्कील. शेवटी आम्ही आमचा रोख चिमण्यांकडे वळवला. 

चिमणी म्हणजे अगदी जवळपास सगळीकडे दिसत होती. दाणे टाकल्यावर टिपायला येणारी. घराभोवतीच्या झाडांवर घिरट्या घालणारी. रस्त्यालगतच्या छोट्या छोट्या झाडांवर बसणारी. माझ्या बेचकीने आता चिमण्यांचा माग धरला. तरी खडा काही तिच्यावर बसेना. अगदी तिच्याशेजारून पानं फाडत खडा निघून जायचा. किंवा धुरळा उडवत टप्पा घेउन दुसरीकडे जाऊन पडायचा. चिमणी भुर्रकन उडून जायची. मोठमोठ्याने चिवचिवाट करत. आणि मी राहायचो चरफडत. 

त्या दिवशी भूषण आणि मी रस्त्यालगतच्या गटाराकाठच्या तुतीच्या झुडूपावर लक्ष ठेउन दडून बसलो होतो. चिमणा चिमणीचे एक जोडपे झुडूपावर होते. त्यांच्यावर आमच्या नजरा खिळल्या होत्या. सभोवतालचा कुठलाच आवाज ऐकू येत नव्हता. ऐकू येत होती ती फक्त त्या जोडप्याची चिवचिव. तासदोन तास चिमण्यांचा माग काढत आम्ही त्या तुतीपाशी पोहोचलो होतो. तहानेने जीव कासावीस झाला होता. हा एक शेवटचा प्रयत्न आणि मग आम्ही घरी जाणार होतो. एकच खडा. एकच संधी. त्या एका क्षणासाठी सारे लक्ष एकवटले होते. आणि तो क्षण आलाच! निवडलेला खडा बेचकीच्या चामडी पट्ट्यात डकवला गेला. एका डोळ्याने समोरच्या चिमण्यावर नेम धरून बेचकी ताणली गेली. सारं काही स्तब्ध झाल्यासारखं जाणवलं. श्वास रोखून धरला गेला. 

काही कळायच्या आतच सारं काही घडलं. समोरच्या जोडीतला चिमणा धप्पदिशी तुतीखालच्या गटारात पडला. एक विचित्र किलकारी चिमण्याने पडता पडता दिली. त्या आवाजाने माझ्या छातीत अगदी धस्स झाले. भीतीचा एक भलामोठा काळाशार गोळा माझ्या पोटात उठला. मी धावतच गटारापाशी गेलो. चिमणा गटाराच्या गाळात रुतत होता. छाती फोडून खडा त्याच्या शरीरात घुसला होता. रक्ताने ते इवलंसं शरीर माखून गेलं होतं. डोळे मिटले जात होते. मला त्याला उचलून घ्यावं वाटलं. मी गटाराच्या पाण्यात हात घालू लागलो पण भूषणने मला मागे खेचले. माझ्या डोळ्यांसमोर तो पक्षी गटाराच्या गाळात रुतून गायब झाला. मन अगदी सुन्न सुन्न होऊन गेलं....

 ....माझी बेचकी मी त्याच क्षणी गटारात फेकून दिली. विलक्षण अपराधीपणा मनात दाटून आला होता. 

....त्यानंतर कित्येक दिवस मला तो गटाराच्या गाळात रुतणारा पक्षी दिसू लागला. जीव कासावीस होऊ लागला. प्रायश्चित्त काय असतं हे कळण्याइतकं ते वय नव्हतं. पण मी पुन्हा कधीच पक्षी मारायचे नाही, हे मनोमन ठरवून टाकले. 

पुढे पक्ष्यांशी संबंध तसा आलाच नाही. आणि विरारहून मुंबईला गेल्यानंतर पक्षी मनातून उडूनच गेले. नाही म्हणायला सुट्टीत गावाला गेल्यावर मात्र अनेक रंगीबेरंगी आणि सुंदर पक्षी रानात दिसायचे. पण त्यांना पाहिलं की पुन्हापुन्हा डोळ्यांसमोर तोच रुतत जाणारा चिमणा यायचा आणि कुठल्याशी क्लेशदायक जाणीवेने मन अगदी झाकोळून यायचं. 

पक्ष्यांवर खऱ्या अर्थाने प्रेम जडलं ते म्हसळ्याच्या जंगलात ३ महिने केलेल्या कामामुळे. माझ्या आयुष्यालाच कलाटणी देणारे ते दिवस होते. आणि तिथून खऱ्या पक्षी निरीक्षणाला सुरुवात झाली. पक्ष्यांबद्दल जास्तीत जास्त जाणून घेण्याची ओढ मनाला लागली. 

पेणंदला झालेल्या तास पक्ष्याच्या दर्शनानंतर मनापासूनच विद्यार्थ्यांना देखील पक्षी पाहण्याच्या छंदाची ओळख करून द्यावेसे वाटू लागले. आणि तब्बल दोन वर्षांनंतर आता कुठे सफाळे, बोईसर मधील विद्यार्थी मित्र पक्षी निरीक्षण करू लागलेत. कालपरवाच दारशेतच्या वैशालीने, रांजणपाड्याच्या अर्पिताने आणि शिगावच्या दीप्तीने पाठवलेले फोटो पाहून मन वेल्हाळ पाखरू होऊन झेपावू पाहतंय... मुलांच्या, रानाच्या आणि पक्ष्यांच्या दिशेने. 

क्रमशः





Comments

  1. खूपच सुंदर कथन !!

    ReplyDelete
    Replies
    1. आपले नाव मला इथे दिसत नाहीय. पण आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!!

      Delete
  2. वेदना, आपुलकी, प्रायश्चित काय असत, एखाद्याला निसर्गाच्या कुशीत कस ठेवायचे याची तुझ्या लेखात अनुभूती येते। आदिवासी मुलांना चक्क पक्ष्यांवर प्रेम करायला लावणारा तू यातून तुझी आत्मीयता आणि मेहनत दिसून येत😍👍

    ReplyDelete
    Replies
    1. आपले नाव इथे मला दिसत नाहीय पण आपल्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद!!

      Delete

Post a Comment